विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने मिळून सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. त्यांनी पाहिले की प्रत्येक शाळेत किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, प्रवेशद्वारे किती आहेत आणि मोकळी जागा किती आहे. या सर्व माहितीच्या आधारे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात मुलींच्या शाळांना प्राधान्य देण्यात आले होते. कारण काही शासकीय तसेच खासगी शाळांमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये शिक्षक, कर्मचारी, बसचालक किंवा अन्य व्यक्ती मुलींना लक्ष्य करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुलींच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आधी बसविण्यात आले.
advertisement
शहरात काही शाळांना मोठी मैदाने आहेत, काही शाळांमध्ये इमारतींचा परिसर मोठा आहे. अशा ठिकाणी सुरक्षारक्षक असले तरी त्यांची संख्या अपुरी असते. त्यामुळे शाळांमध्ये कचरा टाकणे, साहित्य चोरी होणे, मैदानात रात्री मद्यपान करणे किंवा नशा करणाऱ्या लोकांचा वावर, तसेच इतर गुन्हेगारी घटना घडणे यासारख्या समस्या उद्भवतात.
महापालिकेचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नाही, तर शाळांच्या मालमत्तेचे रक्षण करणे देखील आहे. या कारणामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जात आहेत. पुढच्या टप्प्यात उर्वरित 150 शाळांमध्ये देखील हळूहळू सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक शाळेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळेल आणि गैरप्रकार टाळण्यात मदत होईल.