जलद आणि आरामदायक प्रवासाची नवी सुविधा
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा तब्बल तीन तासांचा वेळ वाचणार आहे. यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान जलदगती गाडी उपलब्ध व्हावी यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. ही मागणी आता पूर्ण होणार आहे.
advertisement
Central Railway: प्रवाशांना रक्षाबंधनसाठी मिळालं मोठं गिफ्ट, दोन दिवस चालणार 18 विशेष गाड्या
प्रमुख स्थानकांवर थांबा
ही गाडी नागपूरहून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या मार्गावर अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या प्रमुख स्थानकांवर गाडीचा थांबा असेल.
आरामदायी आसनांची मागणी
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सध्या फक्त बैठक आसनांची व्यवस्था आहे. पुणे ते नागपूर प्रवासाचा कालावधी 12 तासांचा असल्यामुळे प्रवाशांकडून आरामदायी झोपण्यायोग्य आसनांची मागणी होत आहे. यासंदर्भात रेल्वे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितलं की, प्रवाशांच्या सूचनांची नोंद घेऊन लवकरच रेल्वे बोर्डाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.