पुणे शहरात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने भिडे पूल दिवसा सुरू ठेवावा, तसेच रात्री मेट्रोच्या पुलाचे काम चालू ठेवावे, अशी मागणी सजग नागरिक मंचकडून मेट्रो प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळपासून पूल वाहतुकीसाठी पूर्ण वेळ सुरू करण्यात आला आहे. हा पूल आता वाहतुकीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो प्रकल्पाला मान्यता, सरकारचा मोठा निर्णय
मेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून ते नारायण पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी भिडे पूल मागील काही दिवसांपासून बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे आणि पेठ भागात ये-जा करणारे वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. मात्र पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनधारकांना वळसा घालून जावे लागते.
भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने याचा ताण टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कुमठेकर रोड, केळकर रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, या रस्त्यांवर येतो. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
मेट्रोकडून एप्रिल महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते, तसेच एकूण 45 दिवसांत पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जोरदार पावसामुळे हे काम रखडले. पण मेट्रोकडून डिसेंबर शेवटपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने पूल दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला होता.
दरम्यान, भिडे पूल दिवसभर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा आणि रात्री 10 नंतर मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचकडून करण्यात आली होती. आता यावर अचानक अंमलबजावणी करण्यात आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.






