नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मोरया पार्क येथील रहिवासी तनिष्क गायकवाड हा शुक्रवारी सायंकाळी पिंपळे गुरवमधील ओमकार कॉलनी परिसरातून जात होता. तिथे एका डिलिव्हरी बॉयला काही तरुण बेदम मारहाण करत होते. माणुसकीच्या नात्याने तनिष्कने तिथे मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे मारहाण करणारे तरुण संतापले आणि त्यांनी तनिष्कवरच हल्ला चढवला.
advertisement
हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी तनिष्कच्या डोक्यात दगड घातला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तनिष्क गायकवाड याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी कार्तिक चव्हाण (१९) आणि चिराग पवन घाट (२०) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात क्षुल्लक वादातून हिंसक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे पिंपळे गुरव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
