नागझरी नाल्यावरच स्टॉल
महापालिकेने मासळी बाजारासाठी सुसज्ज इमारत बांधली आहे. मात्र, या इमारतीत व्यवसाय करण्याऐवजी अनेक मासळी विक्रेते बंडू आंदेकरच्या आशीर्वादाने नागझरी नाल्यावरच आपले स्टॉल लावत होते. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, तसेच परिसरातील अस्वच्छताही वाढत होती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अवैध बाजारामुळे आंदेकरला नियमितपणे मोठा आर्थिक फायदा होत होता. याच मार्केटमधून बंडू आंदेकर दहशतीच्या जोरावर महिन्याला 35 लाख रुपये कमवत होता, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
विक्रेत्यांचा इशारा
या कारवाईनंतर मासळी विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी या कारवाईचा निषेध करण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. जर प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही, तर थेट महापालिकेच्या इमारतीसमोरच मासळी विकण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही विक्रेत्यांनी दिला आहे.
बेकायदा व्यवसाय चालू दिला जाणार नाही
प्रशासनाने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरात बेकायदा व्यवसाय चालू दिला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईमुळे आंदेकरच्या आर्थिक स्त्रोताला मोठा धक्का बसला असून, त्याचे साम्राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे. या घडामोडीमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.