क्वालिटी वूड आर्ट या 150 वर्ष जुन्या दुकानाने आपल्या वडिलोत्पार्जित परंपरेत नवा बदल घडवून आणला आहे. या दुकानाचे चौथ्या पिढीतील व्यवसायिक अमित बढाई यांनी सांगितले की, आमचं हे दुकान जवळपास दीडशे वर्षांपासून लाकडी वस्तूंच्या व्यवसायात कार्यरत आहे. आजच्या पिढीला पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वस्तूंचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच आम्ही MDF लाकडापासून बनवलेले आकाशकंदील तयार करण्यास सुरुवात केली. हे कंदील हलके, आकर्षक आणि टिकाऊ आहेत. तसेच त्यांचा पुनर्वापरही करता येतो.
advertisement
MDF कंदील अगदी 100 रुपयांपासून सुरू होतात. बाजारात छोटे, मध्यम आणि मोठे अशा विविध साईजमध्ये तसेच अनेक डिझाईन्समध्ये हे कंदील उपलब्ध आहेत. यामध्ये बॉटल कंदील, कोन कंदील, डमरू, कलश असे अनेक आकर्षक प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे कंदील ‘फोल्डेबल’ असल्याने ते साठवणूक आणि वापरासाठी सोयीस्कर ठरतात. नागरिक आपल्या आवडीप्रमाणे डिझाईन तयार करून घेऊ शकतात. पारंपरिक कागदी कंदिलांच्या तुलनेत MDF कंदील अधिक टिकाऊ सुरक्षितताही वाढते.
मजबुती आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता लक्षात घेता नागरिक दरवर्षी नवा कंदील खरेदी करण्याऐवजी हाच पुन्हा वापरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या कंदिलांचा पर्यावरणपूरकतेसोबतच आर्थिक फायदा देखील होत आहे. रविवार पेठेतल्या या दुकानात दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे. काही ग्राहक स्वतःच्या कल्पनेनुसार रंगसंगती आणि आकार निवडून खास डिझाईनचे आकाशकंदील तयार करून घेत आहेत. पुण्यातील अनेक घरांमध्ये यावर्षी दिवाळीचा प्रकाश केवळ आनंदाचाच नव्हे तर पर्यावरणपूरकतेचाही संदेश देणारा ठरणार आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत MDF आकाशकंदीलांनी दिवाळी सजावटीला नवा ट्रेंड दिला आहे. या मुळे याची मागणी वाढत आहे.