स्पर्धेचा हा दुसरा टप्पा पुणे कॅम्प भागातून सुरू होऊन कोंढवा, नारायणपूर, कापूरहोळ, खेड शिवापूर आणि कोंढणपूर मार्गे सिंहगड घाटात पोहोचणार आहे. या शर्यतीचा समारोप डोणजे आणि किरकटवाडी मार्गे नांदेड सिटी येथील प्रवेशद्वाराजवळ होणार असून हा संपूर्ण प्रवास सुमारे १०९ किलोमीटरचा आहे. या महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धेमुळे सिंहगड घाट रस्ता आणि नांदेड सिटीपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक देखील इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांनी बुधवारी सिंहगड किल्ल्यावर जाण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
आजही हे रस्ते वाहतुकीसाठी बंद -
सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, आजही शहरातील अनेक भागांतील शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. स्पर्धेच्या 'प्रोलाँग रेस'मुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वाहतुकीसाठी हे रस्ते राहणार बंद: सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील वर्दळीचे मार्ग जसे की, फर्ग्युसन महाविद्यालय (FC) रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज (JM) रस्ता आणि या मार्गांना जोडणारे सर्व उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. या सायकल स्पर्धेमुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागरिक जहांगीर चौक, आरटीओ रस्ता, बोलई चौक, मालधक्का चौक या मार्गांचा वापर करून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच गरज नसल्यास खासगी वाहनांचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
