पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेले राजकीय नेते सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. ते शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रात्री पुणे ते वाराणसी असा विमान प्रवास करणार होते. विमानतळावर चेक-इन करण्यापूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी तपासणी केली असता, त्यांच्या बॅगेत रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी तात्काळ पुढील कारवाई सुरू केली.
advertisement
चौकशीदरम्यान, संबंधित पदाधिकाऱ्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हा परवाना केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. विमान प्रवासादरम्यान किंवा दुसऱ्या राज्यात शस्त्र घेऊन जाण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून विशेष परवानगी घेणे आवश्यक असते, जी त्यांनी घेतली नव्हती. त्यामुळे, त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले.
या गंभीर प्रकारानंतर विमानतळ प्रशासनाने त्यांना रिव्हॉल्व्हर घेऊन विमानातून प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. पण एक राजकीय नेता अशाप्रकारे बंदूक घेऊन विमानतळावर पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.