इंद्रायणीचे पाणी वापरावर बंदी
देहू–आळंदी परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
advertisement
3 ते 5 मार्चदरम्यान संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे दाखल होणार आहेत. संभाव्य गर्दी आणि आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार देहू परिसरातील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
संसर्गजन्य रुग्णांना देहू हद्दीत प्रवेशास प्रतिबंध
सोहळ्याच्या कालावधीत सार्वजनिक रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित परिसरात एखादा संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास त्याची व्यवस्था देहू नगरपंचायतीकडून उभारण्यात आलेल्या स्वतंत्र शेडमध्ये करण्यात येईल आणि तेथेच त्यांना राहणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंद्रायणी नदी पात्रात कपडे धुणे, अंघोळ करणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असेही प्रशासनाने बजावले आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






