शरद पवार काय म्हणाले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
advertisement
शरद पवारांचा मोठा वाटा
केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला, असं शरद पवार म्हणाले.
कशाही मूल्यांशी तडजोड केली नाही
राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात; मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सातत्याने जपली. सार्वजनिक जीवनातील चढ-उतारांमधून जात असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास सोडला नाही, असंही पवार यांनी म्हटलंय.
भावपूर्ण श्रद्धांजली!
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हिच प्रार्थना, अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.
