यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी अनेकदा दंडात्मक कारवाई केली. मात्र, दंड असूनही वाहनचालकांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे आता या समस्येवर कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बीआरटी थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. हे कॅमेरे तिसरा डोळा ठरणार असून कोणतेही खासगी वाहन या मार्गावर शिरले तर त्याचे थेट व्हिडिओ पुरावे मिळतील.
advertisement
या पुराव्याच्या आधारे वाहतूक पोलिस आणि बीआरटी विभाग संयुक्तरीत्या कारवाई करतील. एवढेच नाही तर संबंधित वाहनचालकाचे लायसन्स रद्द करण्याचीही प्रक्रिया होणार आहे. म्हणजेच आता फक्त दंड न भरता गाडी चालवता येणार नाही तर थेट वाहन परवाना गमावण्याची वेळ येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 5 बीआरटी मार्ग आहेत. त्यांची लांबी सुमारे 52 किलोमीटर असून 52 बीआरटी थांबे आहेत. यामध्ये निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, चिखली ते जगताप डेअरी स्पाइन रोड, आणि मॅगझीन चौक ते देहू-आळंदी फाटा या मार्गांचा समावेश आहे. या मार्गावरून रोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे त्यांना वेळेत बस मिळत नाही, ट्रॅफिकची समस्या वाढते आणि अपघात घडतात.
नगरपालिकेकडून आणि आरटीओमार्फत एकत्रितपणे ही कठोर मोहीम सुरू केली जात आहे. खासगी वाहन चालकांना आता सतर्क राहावे लागणार आहे. कारण बीआरटी मार्ग ही फक्त सार्वजनिक बससाठीची सुविधा आहे. यामध्ये खासगी वाहनांनी घुसखोरी केली, तर थेट कारवाई होणार आहे.
शहरात काम करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेली ही वाहतूक व्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे असा इशारा दिला जात आहे.