होर्डिंग बसवण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या अहवालात एकूण 21 मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्यात प्रमुख म्हणजे फलकाचा आकार जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट ठेवणे आणि टेरेस आणि कंपाऊंड वॉलवर जाहिरात फलक लावण्यास पूर्ण बंदी घालणे.
उंच आणि मोठे होर्डिंग्ज अधिक धोका निर्माण करतात. उंचावर वाऱ्याचा दबाव जास्त असल्याने असे फलक तुटून पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे टेरेसवर फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि संबंधित विभागांना यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
advertisement
घाटकोपर होर्डिंग अपघातानंतर सरकारने माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने 23 सप्टेंबर रोजी आपला अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केला जो आता मंजूर झाला आहे. अहवालातील शिफारशी पूर्ण करण्यासाठी विभागांना कार्यवाही करावी लागणार आहे.
धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये:
1)फलकांचा आकार: जाहिरात फलकाचा आकार जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
2)टेरेस आणि कंपाऊंड वॉलवर बंदी: इमारतींच्या टेरेस किंवा कंपाऊंड वॉलवर जाहिरात फलक लावण्यास पूर्णपणे मनाई आहे.
3)नोडल यंत्रणा नियुक्त: अनधिकृत फलकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक नोडल यंत्रणा स्थापन केली जाईल. नवीन नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी यावर राहणार आहे.
शहरात अनेक इमारतींवर मोठमोठे होर्डिंग्ज आहेत जे अपघातास कारणीभूत ठरू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे आता या होर्डिंग्जसाठी नियम काटेकोरपणे पाळले जातील आणि अपघात टळण्यास मदत होईल.
सरकारची ही योजना शहरातील सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी नियम कडक करणे आवश्यक होते, कारण उंच होर्डिंग्ज पडल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. आता एका महिन्याच्या आत ही नियमावली पूर्णपणे लागू होईल आणि शहरातील होर्डिंग्ज अधिक सुरक्षित बनतील.