राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पुण्याचे अतूट नाते आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधींना अनेक वेळा अटक करून पुण्यातील येरवडा तुरुंगात तसेच आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यलढ्याचे अनेक टप्पे जवळून पाहिलेलं येरवडा कारागृह हे गांधीजींच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरले आहे. याच तुरुंगात महात्मा गांधींनी स्वतः फोल्डिंग चरखा तयार केला होता, जो त्यांच्या स्वावलंबनाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या तत्त्वांचा प्रतीक मानला जातो.
advertisement
महात्मा गांधी यांचा पुण्याशी असलेला संबंध मुख्यत्वे पुणे करार (पूना करार) या ऐतिहासिक घटनेमुळे आहे, जो सप्टेंबर 1932 मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला होता. या करारामुळे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्याची तरतूद करण्यात आली. महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात असताना, म्हणजे 15 ऑक्टोबर 1930 ते 28 ऑक्टोबर या काळात संत तुकाराम महाराजांचे 16 अभंग इंग्रजीमध्ये अनुवादित केले होते.
पुणे शहर हे सत्याग्रह आणि असहकार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र होते. गांधीजींनी येथे अनेक सभा आयोजित केल्या आणि लोकांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र केले. यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये स्वराज्याची भावना वाढली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मोलाचा वाटा आहे. गांधीजींच्या पुण्याशी असलेल्या या नात्यामुळेच हे शहर स्वातंत्र्य चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. त्यामुळे येरवडा जेल हे केवळ एक कारागृह नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं एक जिवंत प्रतीक आहे.