या अभ्यासात कसबा गणपतीसह पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनी पातळी मोजली जात आहे. यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करून डेसिबलमध्ये ध्वनीची नोंद केली जाते. ही माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा (MPCB) कडे थेट पाठवली जाते. त्यानंतर तज्ज्ञांच्या अभ्यासातून आपल्याला शहरातील ध्वनी प्रदूषणाची खरी पातळी किती आहे, हे समजते. तसेच या आकडेवारीवरून पुढील वर्षी आवाज किती प्रमाणात कमी करता येईल, यांचा अभ्यास केला जातो.
advertisement
केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच मिळाली मोठी भेट, छ. संभाजीनगरकरांचा प्रवास होणार सुखकर
फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थिनी मृण्मयी केदारी हिने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पुणे शहरात 245 हून अधिक मंडळांचे ध्वनी पातळीचे रिडिंग घेतले जाणार आहे. फक्त पुणेच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरात देखील हा उपक्रम राबवला जाणार आहे. विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीदरम्यानही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. यामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाची परिस्थिती अधिक स्पष्टपणे समोर येईल.
तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारच्या नियमांनुसार निवासी भागात रात्री ध्वनीची मर्यादा 45 डेसिबल तर दिवसा 55 डेसिबल इतकी असावी. मात्र उत्सवाच्या काळात ही मर्यादा अनेकदा ओलांडली जाते. ढोल-ताशांचा आवाज, बँड, डीजे यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. कानांचे आजार, उच्च रक्तदाब, झोप न लागणे, मानसिक तणाव अशा अनेक समस्या यामुळे उद्भवतात.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळते आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये ध्वनीप्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास देखील मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा सोहळा असला तरी त्यातून पर्यावरणाला हानी पोहोचू नये, हे महत्त्वाचे आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.