काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सात-बारा व आठ अ उतारे मिळवण्यासाठी त्यांनी हवेली तालुक्यातील संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला. यावेळी तिन्ही महिला तलाठ्यांनी संगनमत करून तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी आणि स्वीकारलेले पैसे
तलाठी प्रेरणा पारधी: त्यांनी २४० प्रतींसाठी तब्बल १६,४०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी चार हजार रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते.
advertisement
तलाठी दीपाली पासलकर: यांनी साडेसहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि ती रक्कम तलाठी पारधी यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले होते.
तलाठी शारदादेवी पाटील: यांनी आधी दीड हजार रुपये स्वीकारले आणि त्यानंतर अजून दोन हजार रुपयांची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
लाचेच्या या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. 'एसीबी'ने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी तलाठी शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पाटील यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, लाचेच्या मागणीत सामील असलेल्या उर्वरित दोन तलाठी प्रेरणा पारधी आणि दीपाली पासलकर यांच्यावरही कारवाईची प्रक्रिया 'एसीबी'ने सुरू केली होती. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिन्ही महिला तलाठ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.