या व्यवसायाची सुरुवात मूळ कुडाळ येथील नारायण गोविंद राजिवडेकर यांनी केली. बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ त्यांनी एका छोट्या दुकानातून टोप्या विकण्यास सुरुवात केली. त्या काळात गांधी टोपी, काळ्या आणि तपकिरी टोप्यांना विशेष मान होता. मेसर्स एन. जी. राजिवडेकर या नावाने सुरू झालेल्या या दुकानातील टोप्या सातारा, कराड आणि कोल्हापूरपर्यंत विक्रीसाठी पाठवल्या जात होत्या.
advertisement
यानंतर त्यांच्या पुढील पिढीत मनोहर राजिवडेकर यांनी व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील खादी ग्रामोद्योग भांडाराकडून टोप्या शिवण्याचे काम मिळाल्याने व्यवसायाला अधिक गती मिळाली. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्यांची ओळख अधिक भक्कम झाली.
सुरुवातीच्या काळात केवळ गांधी टोपी आणि पुठ्याच्या टोप्यांवर भर होता. मात्र काळानुसार ग्राहकांच्या गरजा बदलत गेल्या आणि त्यानुसार व्यवसायातही विविधता आणली गेली. आज येथे सिंथेटिक, जाळीदार, वेलबुटी, लग्नसमारंभासाठी विशेष टोप्या अशा अनेक प्रकार उपलब्ध आहेत. टोप्या स्वतः तयार करण्याऐवजी ऑर्डरनुसार बनवून घेण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे.
पूर्वी 2 ते 3 रुपयांत मिळणाऱ्या टोप्यांची किंमत आज किमान 120 रुपयांपासून सुरू होते. तरीही गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास कायम आहे. विशेष म्हणजे तीन पिढ्यांपासून एकाच कुटुंबातील ग्राहक येथे खरेदीसाठी येत असल्याचे सांगितले जाते.
आज या व्यवसायाची तिसरी पिढी काम पाहत असून चौथी पिढीही यात सक्रियपणे सहभागी झाली आहे. पुण्यात त्यांच्या तीन शाखा कार्यरत आहेत. पारंपरिक व्यवसायात सातत्य ठेवत आधुनिकतेशी जुळवून घेतल्यामुळे टोपीवाले राजिवडेकर हे नाव आजही पुणेकरांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे.





