साधारणपणे दररोज पुण्यातून बिहारकडे तीन ते चार रेल्वे गाड्या धावत असतात. मात्र दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि हडपसर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
advertisement
पुणे स्थानकावरून 22 ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 01415 पुणे–गोरखपूर विशेष गाडी सकाळी 6.05 वाजता सुटणार आहे. त्यानंतर गाडी क्रमांक 01433 पुणे–सांगानेर विशेष गाडी सकाळी 9.45 वाजता रवाना होईल. तसेच गाडी क्रमांक 01449 पुणे–दानापूर विशेष गाडी दुपारी 3.30 वाजता प्रवासाला सुरुवात करेल.
हडपसर स्थानकावरूनही काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात गाडी क्रमांक 01457 हडपसर–दानापूर विशेष गाडी सकाळी 8.30 वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक 01453 हडपसर–गाझीपूर सिटी विशेष गाडी दुपारी 4 वाजता निघणार आहे. या गाड्यांसह इतर नियमित गाड्याही पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत.
रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियोजनासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. अतिरिक्त आरक्षण काऊंटर, प्लॅटफॉर्मवरील पोलिस तैनाती आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.
छठपूजा सणासाठी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पुढील काही दिवस बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही अशीच गर्दी राहणार असून, प्रवाशांनी तिकीट आरक्षण वेळेवर करून प्रवास नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





