मागील तीन दशकांत वृत्तपत्रांच्या छायाचित्रण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे फोटो पत्रकारितेचे स्वरूपही पूर्णतः बदलले आहे. लाइटरूमची जागा आज प्रॉम्टरूम घेऊ लागली असून छायाचित्रकारांनी नेहमीच नावीन्याचा शोध घेत राहणे काळाची गरज बनली आहे.
advertisement
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 86 व्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात भव्य छायाचित्र आणि व्हिडिओ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्स, टीव्ही माध्यमांत काम करणारे 40 पेक्षा अधिक छायाचित्रकार आणि पत्रकारांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या निवडक 300 हून अधिक छायाचित्रांमधून पुणे शहरातील विविध घडामोडींचे अद्वितीय दर्शन घडते.
या प्रदर्शनात नागरी प्रश्न, वाहतूक कोंडी, पावसाचे तांडव, उत्सवांचे रंग, सांस्कृतिक कार्यक्रम, नागरिकांच्या भावना, तसेच अलीकडच्या काळातील चर्चेचा विषय ठरलेला बिबट्या यासंदर्भातील छायाचित्रे विशेष आकर्षण ठरली. अनेक फोटो पत्रकार राज्याच्या बाहेर जाऊन केलेल्या वार्तांकनातील छायाचित्रेही यात समाविष्ट आहेत. संकट, संघर्ष आणि संवेदना यांचे दर्शन घडवणाऱ्या या कलाकृती सामान्य नागरिकांच्या समस्यांपासून ते समाजजीवनातील सकारात्मक बदलांपर्यंत सर्व गोष्टी अधोरेखित करतात.
तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे छायाचित्रकारांनी नेहमीच नवीन शिकत राहणे आणि अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी सांगितले. छायाचित्रणाच्या बदलत्या प्रवाहाचा मागोवा घेणारे आणि पत्रकारांच्या मेहनतीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारे हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.





