पुणे : गणपती बाप्पा म्हणताच आपसूक आपल्या मुखातून 'मोरया' असा जयघोष होतो. हे मोरया म्हणजे काय? आणि आपण असं का बोलतो बरं? याचा कधी तुम्ही विचार केलाय? पुण्यात तर चक्क मोरया गोसावी गणेश मंदिर आहे. इथं दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. मोरया का म्हटलं जातं, याबाबत फार सुंदर अशी आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
गोसावीनंदन हे बाप्पाचे परमभक्त होते. गणेशाचं स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा ते या अवस्थेतून समाधी अवस्थेत गेले. ही समाधी 42 दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला. त्याच्या दर्शनानं ते धन्य झाले. मग गोसावीनंदन मोरया गोसावी बनले. भाविक 'मंगलमूर्ती मोरया' असा गणपती आणि गोसावीनंदनाचा एकत्र जयजयकार करू लागले.
हेही वाचा : Ukadiche Modak : 'या' छोट्या छोट्या चुका टाळा, तुमचे उकडीचे मोदक होतील मऊ आणि स्वादिष्ट!
असं म्हणतात की, मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत असत. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. यामुळे त्यांच्या स्वतःच्या गणेशसेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. मग तिथेही भाविक यायचे. अखेर मोरया गोसावी हे भाविकांच्या आग्रहास्तव चिंचवडला येऊन राहिले. गणपती बाप्पाचे लाडके भक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं.
मोरया गोसावींचं मंदिर हे अत्यंत पुरातन आहे. इथं बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे ज्या भाविकांना अष्टविनायकाचं दर्शन घेणं शक्य होत नाही त्यांनी केवळ मोरया म्हणजेच मयुरेश्वर गणेशाचं दर्शन घेतल्यास त्यांना अष्टविनायक दर्शनाचा लाभ मिळतो, अशीही आख्यायिका सांगितली जाते. दरम्यान, मोरया गोसावी यांच्या घराण्यात साथ पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. भाविक बाप्पांच्या नावासोबत मोरयांचं नाव श्रद्धेनं घेतात. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.'