रीना पाटील पूर्णपणे डोळ्याने अंध आहेत. त्या मूळच्या सांगलीच्या असून त्यांनी इंग्रजी विषयात पदवी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या बँक ऑफ बडोदामध्ये काम करत आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच त्या त्यांचे आयुष्य जगत आहेत. पण खास गोष्ट म्हणजे, त्या फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, कुवेतसारख्या देशांमध्येही गेल्या आहेत. त्या नेहमीच समाजासाठी काम करत राहतात. सरकारच्या योजना समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि शिक्षणासाठी मदत करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
advertisement
रीना पाटील यांनी सांगितले की, मी अंध असूनही आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करते. अंध व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून न राहण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात. त्यांनी सांगितले की, मी ब्लूटूथ कीबोर्ड डिव्हाइस वापरते. याच्या माध्यमातून मी माझा मोबाईल सहजपणे ऑपरेट करू शकते. माझ्या मोबाईलमध्ये Talk Back नावाचे ॲप आहे. या ॲपचा वापर केल्यावर कोणतेही ॲप सहजपणे वापरता येते.
एखाद्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे हे ओळखण्यासाठी आम्ही Look ॲप वापरतो. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला ती व्यक्ती साधारणपणे कशी दिसते याचा अंदाज येतो, असे त्यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो फक्त आम्हाला तुमच्यात सामावून घ्या, असं आवाहन यावेळी रीना पाटील यांनी केलं.