Pune News : पुण्यातील भटक्या श्वानांवर डिजिटल नजर, मायक्रो चिपद्वारे होणार अचूक नोंदणी, असा आहे उपक्रम

Last Updated:

निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेदरम्यान आता श्वानांच्या त्वचेमध्ये मायक्रो चिप बसवली जाणार आहे. या चिपमुळे प्रत्येक श्वानावर अचूकपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

News18
News18
पुणे: पुणे शहरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात आता नव्याने समाविष्ट गावांमधील श्वानांची भर पडल्याने निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम अधिक आव्हानात्मक बनली आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने नवे पाऊल उचलले आहे. दिल्ली आणि जयपूरच्या धर्तीवर आता पुणे शहरात भटक्या श्वानांच्या त्वचेमध्ये मायक्रो चिप बसविण्याचा प्रायोगिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर ठिकाणीही राबवण्यात येणार आहे.
महापालिकेचा दिल्ली-जयपूरच्या धर्तीवरील नवा उपक्रम
निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेदरम्यान आता श्वानांच्या त्वचेमध्ये मायक्रो चिप बसवली जाणार आहे. या चिपमुळे प्रत्येक श्वानावर अचूकपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या मायक्रो चिपमध्ये श्वानाचं वय, रंग, पूर्वी झालेलं लसीकरण किंवा निर्बीजीकरणाची तारीख, श्वान ज्या भागात आढळलं, तसेच त्या प्रक्रियेत सहभागी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवली जाणार आहे.
advertisement
श्वानांची तपासणी करताना स्कॅनर मशीनद्वारे ही सर्व माहिती तत्काळ दिसणार आहे. त्यामुळे पुढील लसीकरण, शस्त्रक्रिया किंवा आरोग्य तपासणीसंबंधी त्वरित उपाययोजना करणं अधिक सुलभ होणार आहे. यामुळे श्वानांच्या स्थलांतर, मृत्यू आणि एकूण संख्येचा अचूक डेटा मिळवण्यासही मदत होणार आहे.
advertisement
एमएसडी या खासगी कंपनीकडून सुमारे 600 मायक्रो चिप्स उपलब्ध झाल्या असून, त्या टप्प्याटप्प्याने श्वानांच्या त्वचेत बसविण्यात येणार आहेत. चिप बसविलेल्या श्वानांवर काही महिन्यांपर्यंत स्कॅनर मशीन आणि संगणकीय यंत्रणेद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या हालचाली, आरोग्य आणि वर्तनातील बदलांचा अभ्यास करून संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
advertisement
या प्रयोगाचे निष्कर्ष समाधानकारक ठरल्यास, पुढील काळात मोठ्या प्रमाणावर मायक्रो चिप खरेदीचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली. दरम्यान, शहर व उपनगरांमध्ये भटक्या श्वानांच्या त्रासाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत श्वानदंशाच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून, लहान मुलांवर हल्ल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत.
advertisement
महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, रेबीजमुक्त शहरासाठी भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. सुमारे 32 गावांचा नव्याने समावेश झाल्याने भटक्या श्वानांची संख्या अंदाजे अडीच ते तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या संख्येने निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हान आहे. मायक्रो चिप बसविण्यासारखा प्रायोगिक उपक्रम श्वानांच्या संख्येवर आणि उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यातील भटक्या श्वानांवर डिजिटल नजर, मायक्रो चिपद्वारे होणार अचूक नोंदणी, असा आहे उपक्रम
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement