RTO Fancy Number: लकी नंबरसाठी पुणेकरांची उधळपट्टी! RTO ची 560000000 रुपयांची कमाई, सर्वाधिक पसंतीचे नंबर कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
RTO Fancy Number: फॅन्सी नंबरसाठी नागरिक विविध कारणांनी स्पर्धा करतात. काहीजण आपल्या जन्मतारीख, लग्नतारीख किंवा शुभ अंकांवर आधारित बेरीज असलेले क्रमांक निवडतात.
पुणे : पुणेकरांचं वाहनप्रेम आणि त्यासोबत असलेला लकी नंबरचा मोह जगावेगळा आहे. नवीन चारचाकी किंवा दुचाकी घेतल्यानंतर वाहनधारकांनी आपल्या गाड्यांना आकर्षक फॅन्सी नंबर लावण्यासाठी अक्षरशः कोटींची उधळपट्टी केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) फॅन्सी नंबरच्या विक्रीतून तब्बल 55 कोटी 76 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ही रक्कम थेट शासनाच्या तिजोरीत जमा होऊन परिवहन विभागाच्या महसुलात मोठी भर पडली आहे.
पुणेकरांच्या आवडीचे फॅन्सी नंबर
आरटीओच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यातील वाहनधारकांना 0001, 0009, 0099, 0999, 9999 अशा क्रमांकांचा सर्वाधिक मोह आहे. हे क्रमांक मिळवण्यासाठी लोक पाच लाखांपर्यंतची बोली लावतात. चारचाकीसाठी या क्रमांकांचे शुल्क 5 लाख रुपये, तर दुचाकी, तीनचाकी आणि मालवाहू वाहनांसाठी 50 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. तरीही या अंकांसाठी लोकांची झुंबड उडते.
advertisement
फॅन्सी नंबरसाठी नागरिक विविध कारणांनी स्पर्धा करतात. काहीजण आपली जन्मतारीख, लग्नतारीख किंवा शुभ अंकांवर आधारित बेरीज असलेले क्रमांक निवडतात. काहीजण मात्र फक्त प्रतिष्ठा आणि वेगळेपणासाठी या आकड्यांवर मोठी रक्कम खर्च करतात. उदाहरणार्थ, डीएल 26 सीए 0001 किंवा एचआर 14 सीए 0099 असे क्रमांक पाहिल्यावर गाडी धारकाचा वेगळेपणा ठळकपणे दिसतो.
advertisement
RTO ची फेसलेस सेवा
यापूर्वी फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत असे. मात्र आता शासनाने फेसलेस सेवा सुरू केली असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडता येते. वाहनधारकांना घरबसल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वेबसाइटवरून आपल्या पसंतीचा क्रमांक निवडता येतो. जर एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले, तर त्या क्रमांकाचा लिलाव घेतला जातो.
advertisement
आरटीओ अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, वाहनधारकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच कार्यालयात पारदर्शकता राखण्यासाठी ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पसंती क्रमांक घेण्यासाठी शासनाने ठराविक शुल्क दर ठेवले आहेत. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने तो क्रमांक देण्यात येतो.
दरवर्षी फॅन्सी नंबरसाठी होणारी मागणी पाहता शासनाने नुकतेच या क्रमांकांच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे. तरीदेखील वाहनधारकांच्या आवडीमध्ये किंचितही घट दिसून आलेली नाही. 0001 हा क्रमांक तर सर्वाधिक लोकप्रिय ठरतो असून, तो मिळवण्यासाठी अनेक शौकीन वाहनधारक लाखो रुपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत.
advertisement
RTO च्या उत्पन्नात मोठी वाढ
view commentsया प्रवृत्तीमुळे आरटीओ कार्यालयाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फॅन्सी नंबरच्या विक्रीतून आलेली 56 कोटींची कमाई ही केवळ आर्थिक लाभ नसून शासनाच्या महसुलात होणाऱ्या वाढीचेही प्रतीक आहे. यातून स्पष्ट होते की, पुणेकर फक्त वाहनप्रेमीच नाहीत तर आपली ओळख वेगळी करण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. वाहन आता केवळ प्रवासाचे साधन राहिलेले नाही, तर व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. त्यावर कोरलेला लकी नंबर तर त्याचा मुकुटच ठरतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 15, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
RTO Fancy Number: लकी नंबरसाठी पुणेकरांची उधळपट्टी! RTO ची 560000000 रुपयांची कमाई, सर्वाधिक पसंतीचे नंबर कोणते?