श्री संत महाराजांच्या वारीसंगे देशभरातील लाखो वारकरी पंढरपूरच्या वाटेवरून पायी चालत आहेत. सोलापुरात दरवर्षी प्रमाणे श्री संत गजानन महाराज आणि सदगुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या भेटीचा कार्यक्रम होणार आहे. ही परंपरा जवळपास 43 वर्षांपासून सुरू आहे. सोलापूर शहरातील सम्राट चौकात असलेल्या श्री प्रभाकर स्वामी महाराज आणि श्री संत गजानन महाराज या दोन संतांच्या पालखीची भेट होत असते.
advertisement
800 किलोमीटर चालत येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त सदगुरू श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या भेटीचा सोहळा होत असतो. भेटीचा सोहळा पार पडल्यावर श्री संत गजानन महाराजांचा अत्यंत आवडता नैवेद्य म्हणजे पिठलं आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. यावेळी येणाऱ्या जवळपास 5 हजार भाविकांसाठी पिठलं, भाकरी, भात, आमटीच्या महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलंय. जवळपास एक महिन्यापासून हा महाप्रसाद बनविण्याची तयारी केली जाते.
काल सकाळपासून 250 महिला भाकऱ्या आणि चपात्या बनविण्याचे काम करत आहेत. 5 हजार भाकऱ्या, 200 किलो तांदळाचा भात, तूरडाळीची आमटी आणि विविध प्रकारच्या भाज्या अशी तयारी याठिकाणी महाप्रसादासाठी करण्यात आली आहे. 250 किलो बेसन, 3 क्विंटल ज्वारी, 2 क्विंटल गहू, 600 किलो तूरडाळ आणि तांदळाचा भात असा महाप्रसाद बनविण्यात आला आहे.