सातारा : जिल्ह्याला अत्यंत सुरेख असं नैसर्गिक सौंदर्य लाभलंय. त्यात अनेक ऐतिहासिक मंदिरांनी जिल्हा संपन्न आहे. सातारा शहरापासून पश्चिमेला 4 किलोमीटर अंतरावर वसलेलं संगम माहुली गाव सर्वांचं लक्ष वेधून घेतं. या गावात विविध मंदिरं आणि ऐतिहासिक घाट आहेत. विशेष म्हणजे इथं कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. त्यावरूनच गावाला नाव पडलंय 'संगम माहुली'.
advertisement
गावात प्रवेश करताच 3 मंदिरांचं दर्शन होतं. पहिलं मंदिर काशी विश्वेश्वर, जे मूळ संगम माहुली गावात आहे. दुसरं रामेश्वर मंदिर जे क्षेत्र माहुलीत आहे. तिसरं संगमेश्वर जे पाटखळ गावच्या हद्दीत आहे. काशी विश्वेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूचं बांधकाम काळ्या दगडांमध्ये कोरण्यात आलंय. मंदिराच्या वरचा भाग मातीच्या बांधकामाचा आहे. हेमाडपंती स्वरूपाची या मंदिराची रचना भाविकांचं लक्ष वेधून घेते.
हेही वाचा : मारुतीरायाची अशी मूर्ती कुठंच पाहिली नसेल; सातारच्या मंदिराची देशभरात ख्याती!
मंदिरात प्रवेश केल्यावर एकसारखे खांब पाहायला मिळतात. या खांबांवर आकर्षक असं इतिहासकालीन नक्षीकाम आहे. मंदिरातील शिवलिंग पूर्णपणे पंचधातूंचं असल्याचं सांगितलं जातं. काळानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिवलिंगावर पितळेचं कवच बसवण्यात आलं. मंदिरात गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा आहे. मंदिर परिसरात 2 पार आहेत, ज्यावर मारुतीरायांचं दर्शन घडतं. या मंदिरात आल्यावर भाविकांना वेगळाच आनंद मिळतो, मन अगदी प्रसन्न होतं, म्हणूनच काशी विश्वेश्वरला 'दक्षिण काशी' म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वराज्याचे चौथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी संगम माहुली गाव वसवलं. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक वारसा आहेच. महाराजांची समाधीसुद्धा इथं आहे. जेव्हा छत्रपती शाहू महाराज एका विधीसाठी संगम माहुली गावात आले होते तेव्हा पंतप्रतिनिधींनी पूजा केली होती. त्यावेळी महाराजांनी त्यांना जवळपास 100 एकर जमीन दिली. त्यानंतर पुढील काळात पंतप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गावात वास्तूकला स्थापना केल्या, असं सांगितलं जातं.





