श्री साईबाबांना देश विदेशातील लाखो साई भक्त गुरु मानतात. श्री साईबाबांचे भक्त तात्यासाहेब नुलकर हे त्यांची आई वसाहतू यांना घेऊन शिर्डीत आले होते. त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा असल्याने तात्यासाहेब नुलकरांनी पौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा केली. ते गेल्यावर बाबांनी तात्या पाटील कोते यांना बोलावणे पाठवले. त्यावेळी तात्या पाटील कोते हे आपल्या शेतावर काम करत होते. बाबांचे बोलवणे आल्यानंतर लगेचच ते बाबांकडे आले.
advertisement
Guru Purnima 2025: शिर्डीतील गुरुपौर्णिमा, साई भक्ताचा अनोखा उपक्रम, 1800 फोटोंचा तो खजिना खुला!
बाबा त्यांना म्हणाले.' तो काय एकटाच माझी पूजा करतो, तुला करायला काय झाले? भक्तांच्या मनात इच्छा असूनही बाबा रागवतील म्हणून त्यांची गुरु म्हणून पूजा करण्याचे धाडस कोणी दाखवत नसे. परंतु, आता बाबांनीच अप्रत्यक्ष संमती दिल्याने तात्या पाटील कोते व सर्व भक्तांना खूप आनंद झाला. दादा केळकर हे ज्येष्ठ असल्याने त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी द्वारकामाईत जाऊन गंध, अक्षदा, हार, फुले ,धोतरजोडी घेऊन जाऊन बाबांची पूजा केली. आणि तेव्हापासून साईभक्त गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करू लागले.
हेमाडपंतांनी साई चरित्रच्या अठराव्या अध्यायात गुरुचे वर्णन करताना असे सांगितले आहे की, “साईबाबा अगदी थोडासुद्धा राग–लोभ न करता ज्याचा जसा अधिकार असेल तसाच त्याला खऱ्याखुऱ्या मार्गाचा उपदेश करतात.” त्यातूनच हेमाडपंतांनी साईबाबांचा उल्लेख ‘साईनाथ गुरु माझे आई , मजला ठाव द्यावा पायीव असा केला.
साईबाबांचा प्रथम साक्षात्कार हा सध्याचे बाबांचे गुरुस्थान या ठिकाणी झाला. त्याच ठिकाणी साईबाबा ध्यान करत असत. हे स्थान आपल्या गुरुचे असून हे आपल्याला अत्यंत प्रिय आहे, असे बाबा म्हणत. यातूनच गुरुला जीवनात किती महत्त्व आहे हे दिसून येते. तेव्हापासून ते आज पर्यंत शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)