पाटणा : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळत आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे जेव्हा वनवासात होते, त्यादरम्यान त्यांनी निषाद राज सोबत मैत्री करुन आणि माता शबरीची उष्टी बोरे खाऊन जनकल्याणासाठी सामाजिक समरसतेचा संदेश दिला होता. आता प्रभू श्रीरामाच्या दिव्य मंदिराचे निर्माणकार्य सुरू आहे. त्यामध्ये वंचित समुदायातीलच कामेश्वर चौपाल यांनी राम मंदिर निर्माण कार्यात पहिली वीट ठेवली.
advertisement
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आज अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर उभारले जात आहे. असे असताना या कामाची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल हे देखील स्वतःला धन्य मानून देवाचे कार्य पुढे नेत आहेत. कामेश्वर चौपाल हे बिहारमधील रहिवासी आहेत. मंदिर आंदोलनादरम्यान, ते एक कार्यकर्ता होते. मात्र, आता त्यांना जेव्हा मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचण्याची संधी मिळाली तेव्हा ते सनातन धर्माच्या एकतेचे प्रतीक म्हणून उदयास आले.
त्यावेळच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, त्यावेळी ते एक सामान्य कार्यकर्ता होते. मात्र, ते मंदिर चळवळीत सक्रिय राहिले. संतांच्या आवाहनावर देशभरातून लाखो कार्यकर्ते अयोध्येत पोहोचले होते. हजारोंच्या संख्येने संतही तेथे होते. याचदरम्यान, आंदोलनाचे नेते अशोक सिंघल यांनी त्यांना बोलावून बसवले. त्यानंतर मंचावरून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इतक्या महापुरुषांमध्ये हे सौभाग्य मला का मिळत आहे, हे काही क्षण मलाच समजले नाही. नंतर देवाची इच्छा समजून मी हे काम केले.
यासाठी झाली निवड -
चौपाल यांनी सांगितले की, त्या काळातील संतांनी भगवान श्री राम यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला होता. राम वनात गेल्यावर कोणत्याही राजा-महाराजाच्या दारात गेला नाही. एकतर साधुसंतांच्या किंवा समाजातील वंचित लोकांच्या घरी ते गेले. त्यामुळे रामाचे कार्य पूर्ण करायचे असेल तर ते समाजातील उपेक्षित घटकांचे प्रबोधन करूनच करता येईल, असे त्या वेळी संतांना वाटले असेल. त्यामुळेच माझी निवड झाली असावी, असे ते म्हणाले.
संतांनी घेतला होता हा निर्णय -
ते म्हणाले, संतांनी निर्णय घेतला होता की, 1989 मध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या हाताने पहिली वीट रचली जाईल. यानंतर देश एक सूत्रासह उभा राहिला. आंदोलनात जातीभेद, उच्चनीच, मागासलेला-सवर्ण हे सर्व भेद मिटले. सर्वजण एकत्र येऊन रामाच्या कार्यात लागले. राम मंदिर आंदोलन कुण्या एका समाजाचे नाही, तर सनातनच्या प्रत्येक व्यक्तीचे होते. मग तो कोणत्याही जातीचा असो आणि त्याचाच परिणाम आज सर्वांच्या समोर आहे, असे त्यांनी सांगितले.