श्री क्षेत्र कोंडेश्वर: अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे पुरातन शिव मंदिर आहे. हे मंदिर पाच हजार वर्षे जुनं आहे. अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराला 50 वर्षे झाली आहेत. या मंदिरात असलेली पिंड पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली होती, असं सांगितलं जातं. ही पिंड काशी स्थित कौंडिण्य ऋषींच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती. विदर्भाचा राजा हा ब्रह्मावर्ताचा मूळनिवासी होता. तो शिवभक्त होता त्यामुळे त्याने काशीवरून कौंडिण्य ऋषीला बोलावून त्यांच्या हस्ते या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला कोंडेश्वर असं नाव देण्यात आलं, अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.
advertisement
कपिलेश्वर देवस्थान गव्हाणकुंड: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 'गव्हाणकुंड' हे तीर्थक्षेत्र आहे. त्याला कपिलेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेली सात कुंडं आहेत. येथील शिवलिंगावर सतत दुधाची धार पडत होती, असं स्थानिक नागरिक सांगतात. शिवलिंगाजवळून एक भुयार असून ते सालबर्डीपर्यंत जाते, अशी माहिती गावकरी सांगतात. या भुयारात बाराही महिने पाणी असते. पूर्वी ज्या ठिकाणाहून दुधाची धार पडत होती तेथूनच आता पाण्याचा प्रवाह सुरू आहे. उन्हाळ्यात कितीही तापमान वाढलं तरीही पाण्याचा झरा बंद होत नाही. या ठिकाणी भुयारात आणखी एक अमृत कुंड आहे. स्वयंभू शिवलिंग, नाग, नंदी आणि इतर रचना स्वयंभू आहेत, असं ग्रामस्थ सांगतात.
तपोवन परिसरातील जपानी शैलीतील शिव मंदिर: विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या तपोवनात रुग्णांना आसरा दिला जातो. या रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या शिवाजीराव पटवर्धन यांच्या कन्या श्रीमती अनुताई भागवत 1971-72 मध्ये रुग्णांच्या पुनर्वसनाशी संबंधित माहिती घेण्यासाठी जपानला गेल्या होत्या. त्याठिकाणी जाऊन त्यांनी अनेक बाबींचा अभ्यास केला. जपानमध्ये असताना तेथील मंदिरं त्यांना बघायला मिळाली. त्या मंदिराची रचना अतिशय सुबक आणि आकर्षक होती. जेव्हा त्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी तपोवनात सुद्धा जपानी शैलीतील शिव मंदिर बांधलं. या मंदिराची मूळ स्थापना 1946 मध्ये झाली होती. 1974-75 मध्ये त्याची जपानी शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली. अशा प्रकारचं हे पहिलंच महादेव मंदिर आहे.
तपोवनेश्वर मंदिर: अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर पोहरा येथील घनदाट जंगलात तपोवनेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची अख्यायिका रामायणाशी सबंधित आहे. येथील शिवलिंगाचा आकार इतर ठिकाणी असणाऱ्या शिवलिंगाच्या आकारापेक्षा लहान आहे. हे शिवलिंग थोड त्रिकोणी असल्याचं दिसून येतं. हे शिवलिंग जागृत असल्याची मान्यता आहे. श्रावण महिन्यात फक्त सोमवारीच नाही तर प्रत्येक दिवशी भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.