जालना: आपल्यापैकी अनेक जण गणरायाची भक्तिभावाने आराधना करत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येत असतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे. त्याचबरोबर विनायक चतुर्थी ही मंगळवारी आलेली असल्याने या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे देखील म्हटले जाते. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि त्यातील फरक अनेकांना माहिती नसतो. याबाबत जालना येथील ज्योतिष अभ्यासक राजेश सामानगावकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
विनायक चतुर्थीचे महत्त्व
13 फेब्रुवारी रोजी माघ शुद्ध चतुर्दशी म्हणजेच विनायकी चतुर्थी आहे. त्याचबरोबर गणपतीचा जन्मोत्सव देखील आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधलं जातं. श्री गणेशाचा जन्म झालेली विनायकी चतुर्थी 13 फेब्रुवारीला आहे. तसेच ही चतुर्थी मंगळवारी आलेली असल्याने अंगारकी चतुर्थी देखील आहे. त्यामुळे या चतुर्थीचे विशेष असं महत्त्व आहे.
जप करताना माळ कशी धरावी? शुभ फळ प्राप्तीसाठी हे नियम माहिती हवेच, Video
गणपती हा प्रत्येक शुभकार्याची देवता आहे. 13 फेब्रुवारी रोजी विनायकी चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग आहे. हा पर्वकाळ मानला जातो. गणपतीची सेवा करणे, गणपतीचा अभिषेक करणे, अथर्वशीर्षचे पठण करणे, संकट नाशनाचा स्त्रोत्र करणे, ज्या कोणत्या कारणाने आपण गणपतीची आराधना करू त्यासाठी शुभ फल देणारी ही चतुर्थी आहे. या दिवशी अनेक स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी व्रत करतात. तर काही स्त्रिया झालेल्या पुत्राला दीर्घायुष्य मिळावे म्हणून देखील व्रत करतात. एकादशी प्रमाणे निरंकार उपवास करून विनायक चतुर्थीला कठोर व्रत केलं जातं. या चतुर्थीला तीळकुंज चतुर्थी असे म्हणतात, असंही सामानगावकर सांगतात.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
विनायक चतुर्थी बरोबर संकष्टी चतुर्थीचे देखील विशेष असं महत्त्व आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी 28 तारखेला येत आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करण्याची देखील परंपरा आहे. अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करून आपल्या मनातील मनोकामना गणपतीला सांगतात.
शेकडो वर्षांपासून या गावात लग्नच होत नाही, पाहा काय आहे परंपरा?
अशी आहे अख्यायिका
गणपती लहान असताना एका सावकाराच्या शेतातील बारा गहू खाल्ले होते. या गव्हाचं ऋण फेडण्यासाठी श्री गणेशाने त्या सावकाराच्या इथे घरकाम करण्यास सुरुवात केली. एके दिवशी सावकाराच्या घरातील गणेशाच्या मूर्तीला बाजूला सारून बालगणेश स्वतः त्या ठिकाणी बसले. त्यावेळी सावकार गणेशावर ओरडले. श्री गणेशाने जेव्हा सावकाराला स्वतःचे खरे रूप दाखवले तेव्हा सावकाराला साक्षात्कार झाला. त्यावेळी श्री गणेशाने आपण केलेल्या बारा गव्हाच्या चोरीबद्दल एवढे दिवस आपल्या घरात सेवा केल्याचे सांगितलं, अशी आख्यायिका संकष्टी चतुर्थी बाबत सांगितली जाते असं राजेश सामानगावकर यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)