पुणे: देशात सर्वत्र होळी आणि धुलिवंदनचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून राज्यातही धुळवड साजरी होतेय. पुणेकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील धुलिवंदनचा उत्साह दिसून येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडपात द्राक्ष महोत्सव करण्यात आला आहे. तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची आरास बाप्पांना करण्यात आली आहे. त्यामुळे ही आरास पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
advertisement
काळ्या आणि हिरव्या रंगाच्या द्राक्षांनी गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित द्राक्षांची आरास करण्यात आली.
Dhulivandan: रंग खेळण्यावरून वाद, लढवली शक्कल, हत्तीवरून केलं असं काही की पाहात राहिलं आख्खं गाव!
द्राक्षे प्रसाद म्हणून वाटणार
सह्याद्री फार्माला 22 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून दगडूशेठ गणपती मंदिरात द्राक्षाच्या हंगामात खास आरास केली जाते. यंदा देखील याच कंपनीने दगडूशेठ गणपतीला 2 हजार किलो द्राक्षे दिली आहेत. आता आरास केलेली ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
आयुर्वेदात द्राक्षांचं महत्त्व
भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. द्राक्षे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि हिमोग्लोबिन पातळी वाढते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले.