सातारा : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. साताऱ्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. वाईला पावसाचा फटका बसलाय, इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिराला पुरानं वेढलंय, अगदी मंदिरातील बाप्पाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचलंय. मात्र एवढ्या पाण्यातही मंदिर अगदी जसंच्या तसं उभं आहे.
धोम धरणातून 7636 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहतेय, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं किनारी वसलेल्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा निर्माण झालाय.
advertisement
हेही वाचा : मारुतीरायाची अशी मूर्ती कुठंच पाहिली नसेल; सातारच्या मंदिराची देशभरात ख्याती!
साताऱ्यातील वाईचं गणपती मंदिर अत्यंत पुरातन आहे. त्याचं बांधकाम अतिशय सुंदर असं मत्स्य आकारात असून ते 1762 सालचं असल्याचं सांगितलं जातं. या मंदिरात सलग दगडातून घडवलेली बाप्पाची भव्य मूर्ती आहे. बांधकामाच्या वेळीच नदीच्या पाण्यापासून रक्षणासाठी या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आली होती. कृष्णा नदीकिनारी हे मंदिर असल्यानं योग्य ती काळजी घेण्यात आली. गर्भगृहामागच्या भिंतीची रचना नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्य आकारात आहे. या रचनेमुळे नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर पाणी दुभंगलं जातं. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं. परिणामी कितीही मोठा पूर आला तरी बाप्पाच्या या मंदिराला आणि मूर्तीला कोणताही धक्का लागणार नाही, असं ग्रामस्थ सांगतात.
केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून भाविक इथं बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. आतापर्यंत या मंदिरानं मोठमोठे पूर सोसले, मात्र 300 वर्षांपासून हे मंदिर कृष्णाकाठी दिमाखात उभं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थापत्त्यकलेचा हा अद्भुत नमुना आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं भविष्यातील हवामान स्थितीचा विचार करून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय.





