पिंपरी-चिंचवड : कराटे हा आता एक प्रसिद्ध क्रीडा प्रकार म्हणून समोर येतोय. अगदी गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हा खेळ विविध स्तरांवर खेळला जातो. पुण्यातील पिंपरी-चिंचवड इथं राहणाऱ्या समर्थ हेगडे या चिमुकल्यानं वयाच्या सहाव्या वर्षी कराटेचं प्रशिक्षण घेऊन 2 वर्षात 20 हून अधिक राष्ट्रीय स्तरीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत सुवर्णपदक पटकावले. नुकत्याच झालेल्या बुडोकॉन कप-दुबई आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी 2 सुवर्णपदक जिंकण्याची उत्कृष्ट कामगिरी त्याने केली.
advertisement
समर्थची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होती. त्यानं वयाच्या सहाव्या वर्षी कराटे शिकायला सुरुवात केली असली तरी 2 वर्षातच ब्लॅक बेल्ट-लेव्हल 1 मिळवत 10 हून अधिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि आतापर्यंत 20 हून अधिक पदकं पटकावली आहेत.
हेही वाचा : police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज
'मला सुरुवातीला कराटेबद्दल काही माहित नव्हतं. कराटे प्रशिक्षक तेज प्रताप यांनी काथा आणि कुमेते लेव्हलपर्यंत आणण्यासाठी खूप मदत केली. मी 2 वर्षात अनेक प्रकारच्या स्पर्धादेखील खेळलो आहे. माझा खेळ पाहून कराटे असोसिएशन ऑफ इंडियानं माझी निवड दुबई इंटरनॅशनल कराटे स्पर्धेसाठी केल्यानंतर मी खूप मेहनत घेतली. यामध्ये मला 2 गोल्ड मेडल मिळाले. या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं, आई-वडील व प्रशिक्षक यांनी मदत केली', असंच पुढे खेळत मला भारताचं नेतृत्त्व करायचंय असं समर्थ सांगतो.
'दुबई याठिकाणी झालेल्या स्पर्धेत हजारपेक्षा जास्त स्पर्धेकांनी भाग घेतला होता. त्यात समर्थने 2 गोल्ड मेडल मिळवले. तो खूप मेहनत करतो आहे. त्याने हे यश एवढ्या कमी वयात मिळवलं, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे', अशा भावना समर्थचे वडील लक्ष्मीष हेगडे यांनी व्यक्त केल्या.