या दोघांनीही याआधीच कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्यांचा एकमेव उद्देश 2027 मध्ये आफ्रिकेत होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकणे आहे. जरी अनेकांना वाटत असले की हे दोघे महान खेळाडू या विश्वचषकासह त्यांच्या कारकिर्दीचा शानदार शेवट करतील, तरी दैनिक 'जागरण'च्या एका वृत्तानुसार गोष्टी इतक्या सोप्या नाहीत.
या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही कोहली आणि रोहितची भारतासाठी शेवटची एकदिवसीय मालिका असू शकते. या मालिकेनंतर ते दोघेही निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. एका बीसीसीआय (BCCI) सूत्राच्या हवाल्याने या वृत्तात असेही म्हटले आहे की, जर या दोन्ही खेळाडूंना 2027 च्या विश्वचषकात खेळायचे असेल तर त्यांना या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी (भारताची प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा) मध्ये खेळावे लागेल.
advertisement
यापूर्वी भारतीय खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
रोहित आणि कोहली यांना एकदिवसीय क्रिकेटमधून वगळण्यामागे भारतीय संघात युवा व्हाईट-बॉल खेळाडूंची वाढती संख्या हे एक प्रमुख कारण आहे. या वृत्तानुसार बीसीसीआय व्यवस्थापन आणि निवड समिती 2027 च्या विश्वचषकासाठी युवा खेळाडूंच्या निवडीचा विचार करत आहे.
रोहित आणि कोहली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता. पण त्यांनी मे महिन्यातच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यांनी टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर लगेचच टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
भारताचा पुढील एकदिवसीय दौरा ऑस्ट्रेलियाचा आहे जो 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल. हे सामने पर्थ, ॲडलेड आणि सिडनी येथे खेळले जातील.
त्यानंतर डिसेंबरमध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. 2026 मध्ये भारताच्या एकदिवसीय वेळापत्रकात न्यूझीलंड (जानेवारी), अफगाणिस्तान (जून), इंग्लंड (जुलै), वेस्ट इंडिज (सप्टेंबर) आणि पुन्हा न्यूझीलंड (ऑक्टोबर) यांच्याविरुद्धच्या मालिकांचा समावेश आहे.