दुबई: आशिया कप 2025 मधील सर्वात हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झाला. पाकिस्तानविरुद्धची ही लढत भारताने 7 विकेट राखून जिंकली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दिलेले 128 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने फक्त 3 गडी आणि 15.5 ओव्हरमध्ये पार केले. मात्र त्याआधी सामन्याच्या सुरुवातीआधीच एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला, जेव्हा आयोजकांकडून एक मोठी चूक झाली.
advertisement
नाणेफेकीच्या (टॉस) अगदी आधी पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी अचानक “जलेबी बेबी” या पॉप गाण्याचा इंट्रो स्पीकरवर वाजायला लागला. स्टेडियममधील खेळाडू आणि प्रेक्षक काही क्षणांसाठी गोंधळून गेले. पाकिस्तानी खेळाडू मैदानावर अस्वस्थ उभे राहिले आणि याच वेळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. काही मिनिटांनंतर आयोजकांनी आपली चूक सुधारली आणि योग्य राष्ट्रगीत वाजवले, पण तोपर्यंत ही घटना चर्चेचा विषय ठरली आणि या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
पाकिस्तानची लाज गेली
हा सामना दोन्ही देशांमधील राजकीय तणाव आणि अलीकडील घटनांमुळे अधिक संवेदनशील मानला जात होता. अशा वेळी ही चूक आणखीच गंभीर ठरली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात कोणताही बदल न करता मैदानात उतरले होते.
या विजयासह भारताने आशिया कपच्या सुपर फोर फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन्ही लढती जिंकल्या असून आता त्यांची ग्रुप फेरीतील अखेरची लढत ओमानविरुद्ध असणार आहे. ही लढत 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर फलंदाजीत कर्णधार सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 47 धावांची खेळी केली.