कशी झाली गिल-अविनाशची मैत्री?
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये राहणारे रामविलास शाह मागच्या बऱ्याच वर्षांपासून ज्युस विकत आहेत. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमच्या गेट क्रमांक-1 च्या बाहेर रामविलास यांचा ज्युसचा ठेला आहे. रामविलास यांच्या या ठेल्यावर शुभमन गिल लहान असल्यापासून त्याच्या वडिलांसोबत मोसंबी ज्युस प्यायला यायचा. रामविलास यांचा मुलगा अविनाशही स्टेडियमच्या मागे ग्राऊंडवर ट्रेनिंग करायचा. अविनाश कुमार हा फास्ट बॉलर होता.
advertisement
टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना अविनाश कुमारने 2014 मधल्या आठवणी सांगितल्या. शुभमन दिलचे वडील लखविंदर सिंग यांनी आपलं आयुष्य कसं बदललं? याबाबत बोलताना अविनाश भावुक झाला. 'मी क्रिकेट सोडल्याचं गिलला सांगितलं. वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी फोटो स्टुडिओमध्ये कामाला सुरूवात केली. आर्थिक तंगीमुळे मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. पण गिलचे वडील लखविंदर सिंग माझ्या या निर्णयामुळे नाराज झाले. क्रिकेट पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते, असं ते मला म्हणाले', असं अविनाशने सांगितलं. अविनाश हा शुभमन गिलपेक्षा 2 वर्ष लहान आहे.
गिलच्या वडिलांनी मैदानात उतरवलं
गिलच्या वडिलांनी अविनाशला एक व्हिडिओ दाखवला, ज्यात साईड आर्म थ्रोअरचं ट्रेनिंग होतं. याचसोबत त्यांनी अविनाशला पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरूवात करून कठोर मेहनत करायला सांगितली. इथूनच गिल आणि अविनाशची मैत्री आणखी घट्ट झालं. 'मी गिलला अकादमीपासून ओळखत होतो, पण या घटनेनंतर मी त्याचा पर्सनल साईड-आर्म थ्रोअर झालो. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत', असं अविनाश म्हणाला.
'मला तेव्हा रोज 150-200 रुपये मिळायचे, पण मी गिल किंवा त्याच्या वडिलांकडून पैसे घेतले नाहीत. होळी आणि दिवाळीच्या वेळी ते मला पैसे द्यायचे. त्यांनी माझ्या कुटुंबाची मदत केली, रुग्णालयातही घेऊन गेले. मी कायमच त्यांचा आभारी राहीन', अशी भावनिक प्रतिक्रिया अविनाशने दिली.
सुरूवातीला शुभमन लॉफ्टेड शॉट मारायचा नाही, कारण त्याने सरळ खेळावं, असं त्याच्या वडिलांना वाटायचं. गिलने रेंज हिटिंगला अंडर-19 वर्ल्ड कप आणि आयपीएलनंतर सुरूवात केली. 2 रन जास्त घ्यायच्या नादात आऊट होऊन काय फायदा? असं गिल म्हणायचा, पण नंतर टी-20 क्रिकेटमध्ये सिक्स मारणं गरजेचं आहे, हे त्याला समजलं, त्यामुळे त्याने मोठे शॉट मारण्याचा सराव सुरू केला, त्यानंतर गिलने मागे वळून पाहिलं नाही, असंही अविनाशने सांगितलं.