भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला एडलेडच्या मैदानावर सुरू झाला. पाच दिवसांची डे-नाइट कसोटी फक्त अडीच दिवसात संपली. गुलाबी चेंडूने खेळलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. पहिल्या डावात १८० तर दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त १६७ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या फक्त तीन गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दोन्ही डावात मिळून तिघांनी २० विकेट घेतल्या. यात स्टार्कने ८, कमिन्सने ७ आणि बोलंडने पाच विकेट घेत भारतीय फलंदाजीचं कंबरंड मोडलं.
advertisement
दोन्ही डावात मिळून भारतीय संघाने ८१ षटके खेळून काढली. कसोटी सामन्यात एका दिवसात ९० षटके खेळली जातात. भारतीय संघाला असा एक दिवसही खेळता आला नाही. दोन्ही डावात मिळून ९० षटके भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले नाही. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतीय संघाला ४४.१ षटकात बाद केलं. तर दुसरा डाव ३६.५ षटकातच आटोपला.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाना दुसऱ्या दिवस अखेर ५ बाद १२८ धावा करता आल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत बाद होताच लागोपाठ विकेट पडल्या. पंत दुसऱ्या दिवशी एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी यानं केलेल्या फलंदाजीमुळे डावाने पराभव टाळता आला. नितीशकुमारने दुसऱ्या डावात ४२ धावा केल्या.