मुंबई : आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाचे खेळाडू स्वदेशात परतले आहेत. भारतीय खेळाडू आपल्या-आपल्या शहरांत पोहोचत आहेत आणि प्रत्येकाचे भव्य स्वागत होत आहे. टीम इंडियाच्या फायनल मॅचचा हिरो आणि मॅन ऑफ द मॅच तिलक वर्मा हैदराबादला पोहोचला तेव्हा त्याने माध्यमांशीही संवाद साधला.
advertisement
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तिलक म्हणाला की, संघ आणि देशासाठी चांगला खेळ केल्याचा अभिमान वाटतोय. सामन्यादरम्यान भावना खूप तीव्र होत्या. पाकिस्तानने सामन्यादरम्यान भरपूर स्लेजिंग केली, पण आम्ही संयम राखला.
यावेळी तिलकने हारिस रऊफची मजा घेतली. हारिस जरी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज असला तरी मीही सर्वोत्तम फलंदाज आहे. शिवम दुबे बाद झाल्यानंतर मला पूर्ण विश्वास होता की, मी सामना जिंकवून देऊ शकेन आणि मी ते करूनही दाखवले.
तिलकच्या नाबाद 69 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने रविवारी दुबईत झालेल्या फायनलमध्ये पाच विकेट्सने विजय मिळवला. दुबईहून परत आल्यानंतर तिलक म्हणाला, सुरुवातीला थोडा ताण व दबाव होता, पण मी देशाला सर्वांत वरचं स्थान दिलं आणि मला देशासाठी जिंकायचं होतं. मला माहित होतं की, जर दबावाखाली कोसळलो तर स्वतःलाही आणि देशातील 140 कोटी जनतेलाही निराश करीन.
तिलकने सांगितले की- पाकिस्तानी खेळाडूंनी सामन्यात स्लेजिंग केली, पण मी गप्प राहणं पसंत केलं. आम्ही तीन विकेट्स पटकन गमावल्या होत्या आणि वातावरण तंग झालं होतं. मी लवकर फलंदाजीला आलो, पण मी कुणाला काहीही बोललो नाही आणि कुठलाही वाईट फटका मारून संघ आणि देशाला निराशही केलं नाही.
भारताला शेवटच्या षटकात १० धावा हव्या होत्या आणि तिलक वर्मा म्हणाला की, त्या वेळेपर्यंत तो दबावावर मात करून खेळत होता.