खरं तर पाकिस्तान खेळाडूंच मैदानावरील वर्तन आणि मोहसीन नक्वीच्या ट्रॉफी न देण्याच्या कृतीनंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर आशिया कपनंतर आता महिलांची आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत आता बीसीसीआयने भारतीय कर्णधाराला पाकिस्तानी कर्णधार आणि खेळाडूंसोबत हॅन्डशेक टाळण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे आशिया कपप्रमाणेच आता आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये देखील हॅन्डशेकचा मुद्दा चांगलाच पेटणार आहे.
advertisement
आशिया कप मोहिमेदरम्यान भारताच्या पुरुष संघाने घेतलेल्या भूमिकेनंतर आता महिला संघालाही रविवारी कोलंबो येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक साखळी सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंशी हॅन्डेशेक न करण्याचा सल्ला बीसीसीआयने दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघ बुधवारी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन टाळण्याचा संदेश देण्यात आला, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. विश्वचषकादरम्यान संघ पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन करणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल संघाला कळवले आहे. भारतीय बोर्ड त्यांच्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहील, असे सूत्रांनी सांगितले.
भारत-पाक सामना कधी?
आयसीसीच्या वुमेन्स वर्ल्डकपला 30 सप्टेंबरपासून सूरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरूद्ध पार पडला आहे. हा सामना भारताने जिंकला होता. या सामन्यानंतर टीम इंडिया 5 ऑक्टोबर 2025 ला थेट पाकिस्तानशी भिडणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सूरूवात होणार आहे.
बैठकीनंतर मोहसीन नक्वींची पहिली प्रतिक्रिया
आशियाई क्रिकेट परिषदेचा (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी याने मौन सोडलं आहे. रविवारी भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला, तेव्हाही आपण त्यांना ट्रॉफी द्यायला तयार होतो आणि आताही तयार आहोत. सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमने एसीसीच्या ऑफिसमध्ये यावं आणि माझ्याकडून ट्रॉफी न्यावी, त्यांचं स्वागत आहे, असं नक्वी म्हणाला आहे.
पीसीबीचा अध्यक्ष तसंच पाकिस्तानच्या गृह खात्याचा प्रमुख असलेल्या नक्वीने आपण बीसीसीआयची माफी मागितल्याच्या वृत्ताचंही खंडन केलं आहे. आपण काहीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागणार नाही, असं नक्वी म्हणाला आहे.
'एसीसी अध्यक्ष म्हणून, मी त्याच दिवशी ट्रॉफी सोपवण्यास तयार होतो आणि मी अजूनही तयार आहे. जर त्यांना खरोखरच ट्रॉफी हवी असेल, तर त्यांनी एसीसी कार्यालयात येऊन माझ्याकडून घेऊन जावी. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी कधीही बीसीसीआयची माफी मागितली नाही आणि कधीही मागणार नाही,' अशी पोस्ट नक्वीने केली आहे.