आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव पहिल्या टेस्टमध्ये खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. वॉशिंग्टन सुंदरला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली, तर कुलदीप यादवला बाहेर बसावं लागू शकतं. तर वर्क लोड मॅनेजमेंटसाठी बुमराहला विश्रांतीचा निर्णय घेतला गेला, तर प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते. याशिवाय साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार? याचा निर्णयही कॅप्टन शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीरला घ्यावा लागणार आहे.
advertisement
तब्बल 15 वर्षांनंतर भारतीय टीम घरच्या मैदानात विराट कोहली, आर.अश्विन किंवा रोहित शर्मा यांच्याशिवाय मैदानात उतरत आहे. अश्विनने डिसेंबर महिन्यात तर रोहित आणि विराटने इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे घरच्या मैदानात नोव्हेंबर 2010 नंतर भारतीय टीम या तीनही दिग्गजांशिवाय मैदानात उतरणार आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट-रोहितशिवाय टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून वेस्ट इंडिजची टीम संघर्ष करत आहे, त्यामुळे ही सीरिज 2-0 ने जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे चालून आली आहे, पण मागच्या वर्षी घरच्या मैदानात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने पराभव झाला होता, त्यामुळे आता भारतीय टीम कुठलीच सीरिज हलक्यात घेणार नाही, हे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
पहिल्या टेस्टसाठी भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा