आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडिजचा युवा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सवर कारवाई केली आहे. 24 वर्षीय जेडेन सील्सला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 उल्लंघनाचा दोषी आढळला आहे.त्यामुळे सील्सला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे.जो गेल्या 24 महिन्यांतील त्याचा दुसरा उल्लंघन आहे.त्यामुळे त्याचे एकूण डिमेरिट पॉइंट आता दोन झाले आहेत.
advertisement
वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने शुक्रवारी आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले होते.त्याचं झालं असं की भारताच्या पहिल्या डावाच्या 29 व्या षटकात सील्सने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये बॉल उचलला आणि यशस्वी जयस्वालकडे फेकला,जो जयस्वालच्या पॅडवर आदळला. यानंतर जेडेन सील्सने असा युक्तिवाद केला की त्याने फलंदाजाला धावबाद करण्यासाठी बॉल फेकला होता.परंतु व्हिडिओ रिप्लेच्या आधारे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ही कृती अनावश्यक आणि अन्याय्य असल्याचा निष्कर्ष काढला होता.
मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि पॉल रीफेल, थर्ड अंपायर अॅलेक्स व्हार्फ आणि फोर्थ अंपायर के. एन. अनंतपद्मनाभन यांनी जेडेन सील्सविरुद्ध आरोप दाखल केले. सील्सची कृती आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.9 अंतर्गत येते. खेळाडूवर किंवा त्याच्या जवळ अयोग्य पद्धतीने बॉल किंवा इतर उपकरणे फेकणे हा गुन्हा आहे.त्यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने पहिला डाव 5 विकेट गमावून 518 धावांवर घोषित केला होता. तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 248 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजला फॉल ऑन दिला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज आता 2 विकेट गमावून 173 धावांवर खेळते आहे. अजूनही वेस्ट इंडिज 97 धावांनी मागे आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिज या धावा पुर्ण करते की ऑल आऊट होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.