मुंबई: देशासाठी खेळावं आणि एखादं आंतरराष्ट्रीय पदक जिंकावं, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. एका मराठमोळ्या खेळाडूनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत देशासाठी तब्बल 17 पदकं जिंकली. पण याच खेळाडूवर पोटासाठी कॅब चालवण्याची वेळ आलीये. पराग पाटील असं या आंतरराष्ट्रीय खेळाडूचं नाव असून ते मुंबईत कॅब चालवत आहेत. अनेकदा प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्यानं कुटुंबासाठी हा निर्णय घ्यावा, लागला अशी खंत लोकल18 सोबत बोलताना पराग यांनी व्यक्त केलीये.
advertisement
मुंबईकर पराग पाटील हे ॲथलेटिक खेळाडू आहेत. खेळाची आवड असल्याने त्यांनी लहानपणापासूनच याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांना यश देखील मिळत गेलं. पराग यांनी आतापर्यंत 100 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या सारख्या खेळांमधे देशासाठी 17 आंतरराष्ट्रीय पदके जिंकले आहेत. परंतु, जगण्याच्या शर्यतीत मात्र त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर नोकरी करणं भाग होतं. मात्र, हवी तशी नोकरी मिळाली नाही आणि खेळाकडेही दूर्लक्ष होऊ लागले, असे पराग सांगतात.
शेतकरी आत्महत्या पाहिली अन् IT तली नोकरी सोडली, आता काम असं की, तुम्हीही कराल कौतुक!
स्टेट्स आडवा आला
“एक क्रीडापटू असल्याने मला कोच म्हणून शाळा, महाविद्यालयांत नोकरी करावं, असं वाटत होतं. परंतु, तिकडे नोकरी मिळाली नाही. खासगी क्षेत्रात दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिकडे माझं सेलिब्रिटी स्टेट्स आडवं आलं. त्यामुळे अनेकदा प्रयत्न करून देखील कोणतीही नोकरी मिळत नव्हती. शेवटी कॅब चालवण्याचा निर्णय घेतला. आता कॅब चालवूनच कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असल्याचंही पराग यांनी सांगितलं.
देशासाठी 100 मेडल्स जिंकायचेत
“सध्या परिस्थितीमुळे मी कॅब चालवत आहे. परंतु, मला क्रीडा क्षेत्रात आणखी देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. आतापर्यंत 17 मेडल्स मिळवली असली तरी मला अजून खेळायचं आहे. देशासाठी एकूण 100 मेडल्स जिंकायचं माझं स्वप्न आहे. त्यामुळे कॅब चालवत असलो तरी त्यातून वेळ काढून सराव करतोय. तसेच काही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्यायचंही काम करतोय. थोडं पैसे साठवून पुन्हा पूर्ण क्षमतेनं तयारी करणार आहे” असंही पराग पाटील सांगतात.
मदतीची गरज
पराग पाटील यांच्यामुळे भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उंचावली आहे. तरीही त्यांच्यावर ओढवलेली परस्थिती क्रीडा क्षेत्रासाठी चिंताजनक आहे. पराग यांचा भविष्यात भारतातून जास्तीत जास्त खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजे, असा मानस आहे. तसेच भारतासाठी जास्तीत जास्त मेडल जिंकण्याची इच्छाशक्ती त्यांची आहे. जगण्यासाठी ते कॅब चावलतात, मात्र यामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळत नसल्याची खंतही बोलून दाखवतात. त्यामुळे पराग यांच्यासारख्या खेळाडूंची सरकारने दखल घेऊन योग्य सन्मान देण्याची गरज आहे.