मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात ढोल-ताशांचा ठेका
श्रीनगरमध्ये सोमवारी उणे 2.9 अंश सेल्सिअस इतक्या गोठवणाऱ्या तापमानाची नोंद झाली होती. शिरी गावातही कडाक्याची थंडी आणि वीज कपातीमुळे अंधार होता. मात्र, आकिबच्या यशाच्या बातमीने ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहिला. वीज नसतानाही तरुणांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला, तर महिलांनी पारंपरिक काश्मिरी लोकगीते गाऊन आपल्या लाडक्या लेकाचं कौतुक केलं.
advertisement
बातमी ऐकताच बापाचे डोळे पाणावले
आकिबचे वडील गुलाम नबी हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. सुरुवातीला कुटुंबाची इच्छा होती की आकिबने वैद्यकीय क्षेत्रात (MBBS) करिअर करावं. मात्र, आकिबचे क्रिकेटमधील वेड आणि त्याची जिद्द पाहून वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. मुलाच्या यशाची बातमी ऐकताच बापाचे डोळे पाणावले. "त्याची मेहनत आणि झोकून देण्याची वृत्ती पाहून मला खात्री होती की तो एक दिवस नक्कीच नाव कमावेल," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शेजारी राहणारे रियाज अहमद गनई सांगतात, "आकिब अत्यंत साधा मुलगा आहे. त्याचा प्रवास याच गावातील गल्ल्यांमधून सुरू झाला. आज तो दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला असला, तरी भारतीय राष्ट्रीय संघात खेळण्याचे त्याचे स्वप्न आता फार लांब नाही." गावात कोणत्याही आधुनिक सोयीसुविधा किंवा सुसज्ज क्रिकेटचे मैदान नसतानाही आकिबने गाठलेली ही उंची वाखाणण्याजोगी आहे. आकिबचे यश हे केवळ एका खेळाडूचे यश नसून, ते काश्मीरच्या दुर्गम भागातील हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा असल्याचं बोललं जातंय.
