उत्सव-दे-हंपी 4x4 ऑफरोड चॅलेंज 2023 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये कोल्हापूरच्या अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या जोडीने प्रथम क्रमाक पटकावून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. हे दोघेही कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आहेत. त्यांनी 2022 आणि 2023 अशा सलग 2 वर्ष या स्पर्धेतील स्टॉक पेट्रोल कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमाकांचे विजेते पद पटकावले आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंम्पी येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली.
advertisement
काय आहे उत्सव-दे-हंम्पी 2023?
कर्नाटक पर्यटन, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाद्वारे प्रायोजित विजयनगरच्या मोटर स्पोर्ट्स अकॅडमीने उत्सव-दे-हंम्पी २०२३ ही स्पर्धा आयोजित केली होती. साहसी आणि थरारक अशा 4x4 मोटर स्पोर्ट्स ऑफ रोड चॅलेंजच्या या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते.
ऑफ रोडींग हा एक साहसी खेळ आहे. यामध्ये बैलगाडी किंवा घोडागाडी देखील जिथे जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपले जीप किंवा जिप्सी असे 4x4 गाडी चालवावे लागते. सर्व अडथळे पार करत देण्यात आलेल्या मार्गावर गाडी चालवत तो ट्रॅक पूर्ण करण्याची अशी ही स्पर्धा असते. असे खेळाडू अश्विन शिंदे यांनी सांगितले. तर 2 वर्ष सलग विजेतेपद पटकावणाऱ्या अश्विन आणि कृष्णकांत यांनी पुढच्या वेळीही विजेतेपद मिळवून हॅट्ट्रिक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
गणपती बाप्पाला बांधा कोल्हापुरी फेटा, पाहा सोपी पद्धत
कशी पार पडली ही स्पर्धा ?
कर्नाटकात हंपी 4X4 ऑफरोड चॅलेंज ही 800 गुणांची स्पर्धा होती. या साहसी आणि थरारक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, विजापूर, हसन, कूर, हैदराबाद, बेंगलोर, कर्नाटक, गोवा, केरळ अशा विविध ठिकाणांवरून 64 गाड्या सोबत 168 स्पर्धक सामील झाले होते. ही स्पर्धा होस्पेटच्या हद्दीतील तुंगभद्रा धरणा शेजारच्या गुंडा या जंगलात पार पडली. दोन दिवस ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धकांना दोन दिवसात 8 ट्रॅक पूर्ण करण्याचे ध्येय देण्यात आले होते. एका ट्रॅकला 100 गुण ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी 400 आणि दुसऱ्या दिवशी 360 असे एकूण 760 गुण आम्ही मिळवले होते, अशी माहिती अश्विन शिंदे यांनी दिली आहे.
कोण कोण ठरले विजेते?
या स्पर्धेत स्टॉक पेट्रोल कॅटेगरी मध्ये 800 पैकी 760 गुणांची कमाई करत कोल्हापूरच्या अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. 800 पैकी 715 गुणांची कमाई करत प्रदीप आणि संदीप (बंगलोर) यांच्या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. तर 800 पैकी 703 गुणांची कमाई करत प्लबन पटनायक आणि शेल्टोन (गोवा) या जोडीने तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. विजयी स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी, रोख रक्कम, ऑफ-रोड टायर, व्हील आणि इतर वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
भगवान श्रीकृष्णाचं कोल्हापूर कनेक्शन, महाभारतातील ही ठिकाणं माहितीयेत का?
आपत्तीच्या काळात फायदा
मुळात हा खेळ चित्त थरारक आणि साहसी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापना वेळी देखील या खेळाचा फायदा झालेला आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुरात नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्याचे काम देखील केल्याचे खेळाडू अश्विन शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या अशा अनोख्या आणि साहसी खेळांतील कोल्हापूरच्या खेळाडूंमुळे पुन्हा एकदा कोल्हापूरचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. तर कोल्हापूरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.