आंदोलकांना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये जाऊन पॅलस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढायची होती, पण पोलिसांनी आंदोलकांना राजधानीमध्ये नेण्यापासून रोखलं.
पोलिसांची वाहने चोरली
गुरुवारी सुरू झालेला हिंसाचार शुक्रवारी आणखी तीव्र झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी रबर गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रत्युत्तरादाखल टीएलपी कार्यकर्त्यांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला केला. अनेक ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या ताब्यात घेतल्या आणि जबरदस्तीने व्हॅन हिसकावून घेतली.
advertisement
घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक रहिवासी मोहम्मद जाहिद म्हणाले, 'लोक त्यांच्या घरी पोहोचू शकत नाहीत. पुलाजवळ जोरदार गोळीबार झाले. लहान मुलांनाही श्वास घेण्यास त्रास होत आहे. सरकारने संवादातून तोडगा काढावा'.
दोघांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी; टीएलपीचा दावा
टीएलपीने दावा केला आहे की त्यांचे दोन समर्थक आतापर्यंत मारले गेले आहेत आणि सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. पंजाब सरकारने अद्याप या प्रकरणावर निवेदन जारी केलेले नाही. मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ (पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भाची) यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.
लाहोर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचार अनेक भागात पसरला आहे. आंदोलकांनी कंटेनरवर चढून रस्ते अडवले आहेत. शुक्रवारी लाहोरमधील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले.
इंटरनेट बंद, इस्लामाबादमध्ये हाय अलर्ट
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. टीएलपी रॅली रोखण्यासाठी राजधानीकडे जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर जड कंटेनर ठेवण्यात आले आहेत.
अमेरिकन दूतावासाने देखील अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये नागरिकांना इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
उप-आंतरराष्ट्रीय मंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले की टीएलपीने रॅलीसाठी परवानगी घेतली नव्हती. पण, टीएलपीने मात्र मंत्र्याचा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शांततापूर्ण मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती, असं टीएलपीने सांगितलं आहे.
पाकिस्तान सरकारची कोंडी
टीएलपी ही संघटना वारंवार पाकिस्तान सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावेळी, जेव्हा त्यांनी इस्लामाबादकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने पूर्वसूचना देऊन नाकेबंदी केली. सोशल मीडियावर, लोकांनी सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. अनेकांनी लिहिले की 'आंदोलन सुरू होण्यापूर्वीच रस्ते सील करणे हे सरकारचा कमकुवतपणा दर्शवते', अशी टीका पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्याच सरकारवर केली आहे.