पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजे PCB ने परदेशी टी-ट्वेंटी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द केलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे खेळाडू परदेशी लीग खेळू शकणार नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आशिया कप फायनलच्या एक दिवसानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला. बोर्डाने या निर्णयाचे कारण दिलेलं नाही.
advertisement
एनओसी पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमैर अहमद सय्यद यांनी 29 सप्टेंबर रोजी एका सूचनेद्वारे खेळाडू आणि एजंटना या निर्णयाची माहिती दिली. लीग आणि इतर परदेशी स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दिलेले सर्व एनओसी पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत, असं पाकिस्तानी खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बाबर आझमसह इतर खेळाडूंना मोठा फटका बसलाय, असं मानलं जातंय.
बाबर आझम इतर खेळाडूंना फटका
पाकिस्तानच्या बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ आणि शादाब खान या खेळाडूंना विशेष: मोठा फटका बसेल. हे खेळाडू यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होणार होते. मात्र, त्यांना आता घरीच बसावं लागणार आहे. तर हॅरिस रौफ आणि इतर खेळाडूंना आयएलटी-20 लीगमध्ये खेळतातच. अशातच आता पाकिस्तानच्या निर्णयामुळे खेळाडूंच्या खिशाला देखील कात्री बसली आहे.