टीम इंडियाची 22 वर्षीय स्टार खेळाडू रिचा घोषने वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव केला होता.यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एक स्टेडियम बांधले जाईल, ज्याचे नाव विश्वचषक विजेती क्रिकेटपटू रिचा घोष यांच्या नावावर असेल,अशी मोठी घोषणा केली आहे.
advertisement
उत्तर बंगालमधील सिलिगुडी हे 22 वर्षीय विकेटकीपर-फलंदाज घोष यांचे जन्मगाव आहे, ज्यांनी भारताच्या महिला विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला हरवून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. आयसीसीने अंदाजे 40 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली, तर बीसीसीआयने 51 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होता.
रिचा क्रिकेट स्टेडियम चांदमणी टी इस्टेटमधील २७ एकर जागेवर बांधले जाईल. बंगालमधील तेजस्वी क्रीडा प्रतिभा असलेल्या रिचाचा सन्मान करण्याचा आणि उत्तर बंगालमधील तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याचा हा एक मार्ग आहे,असे ममता बॅनर्जी यांनी सिलीगुडी येथे पत्रकारांना सांगितले.तसेच हा प्रकल्प लवकरच राज्य सरकार सुरू करेल,अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान रिचा घोष यांना शनिवारी पश्चिम बंगाल सरकारने 'बंग भूषण' पुरस्काराने सन्मानित केले, पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नियुक्त केले आणि सोन्याची साखळी दिली होती. तर रिचा घोषने महिला विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, आठ सामन्यांमध्ये १३३.५२ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने २३५ धावा केल्या, जो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व फलंदाजांमध्ये सर्वाधिक आहे.
रिचा घोष या विश्वचषकात शतक हुकली, परंतु सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. रिचाने महिला विश्वचषकात १२ षटकार मारले होते.
