मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी रिटायर हर्ट झालेल्या भारताच्या कसोटी संघाच्या यष्टीरक्षक ऋषभ पंतला पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पंतच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
भारताच्या डावाच्या 68 व्या षटकात, 37 धावांवर फलंदाजी करणाऱ्या पंतने वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सविरुद्ध रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण तो चुकला. यात त्याच्या उजव्या पायावर चेंडू लागला. यानंतर लगेचच ऋषभ पंतने बूट काढले, तेव्हा त्याच्या पायाला सूज आली होती आणि पायातून रक्तही येत होतं. प्रथमोपचार केल्यानंतरही ऋषभ पंतची दुखापत कमी होत नव्हती, अखेर त्याला गाडीमधून मैदानाबाहेर नेण्यात आलं.
advertisement
आता पंतला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पंतच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये एक खेळाडू शॉर्ट असल्याने, टीम इंडिया मॅनेजमेंटने वैद्यकीय पथकाला गरज पडल्यास वेदनाशामक औषध घेतल्यानंतर पंत फलंदाजी करू शकतो का ते तपासण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.
“ पंतच्या स्कॅन अहवालात फ्रॅक्चर दिसून आले आहे आणि तो सहा आठवड्यांसाठी बाहेर आहे. वैद्यकीय पथक वेदनाशामक औषध घेऊन तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही त्याला चालण्यासाठी आधाराची आवश्यकता आहे आणि त्याच्या फलंदाजीची शक्यता खूपच कमी दिसते,” असे बीसीसीआयमधील एका सूत्राने 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले.
दरम्यान, निवड समिती पाचव्या कसोटीपूर्वी इशान किशनचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. पंत 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात सहभागी होणार नाही.
भारत आधीच दुखापतींच्या समस्येचा सामना करत आहे कारण अष्टपैलू नितेश कुमार रेड्डी (गुडघा दुखापत) मालिकेतून बाहेर पडला आहे आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग (अंगठ्याला झालेली दुखापत) चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध नाहीत.
पंतच्या दुखापतीमुळे तो 37 धावांवर रिटायर हर्ट झाला आणि त्याच्या जागी रवींद्र जडेजा मैदानावर आला. जडेजा आणि शार्दुल ठाकूरने दिवसाचा शेवट करण्यापूर्वी भारताने लवकरच साई सुदर्शनला गमावले आणि भारताने दिवसअखेर 4 बाद 264 धावा केल्या.