संजू सॅमसनची शतकीय खेळी
कोची ब्लू टायगर्स संघाकडून सलामीला येत संजू सॅमसनने एरीस कोल्लम सेलर्सविरुद्धच्या सामन्यात वादळी शतक झळकावले. त्याने केवळ ४२ बॉलमध्ये १३ फोर आणि ५ सिक्सच्या मदतीने शतकीय खेळी साकारली आहे. आशिया कप स्पर्धेत सलामीला खेळण्याची संधी टिकवण्यासाठी सॅमसनची ही खेळी खूप महत्त्वाची मानली जातीये.
दोन्ही सलामीवीर कोण?
advertisement
तसेच, आशिया कप स्पर्धेसाठी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे सलामीवीर म्हणून निवडण्यात आले असून सॅमसनला मधल्या फळीत खेळावं लागेल किंवा त्याला संघातून बाहेर बसावं लागेल, अशा चर्चाही सुरू आहेत. याच लीगमध्ये संजूने प्रथम खालच्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याने अचानक प्लॅन चेंज केला अन् सलामीवीर म्हणून दमदार शतक ठोकलं आहे.
सहाव्या क्रमांकावर की सलामीवीर?
याआधीच्या सामन्यात सॅमसनने सहाव्या क्रमांकावर येऊन बॅटिंग केली होती, मात्र तो केवळ २२ बॉलमध्ये १३ धावाच करू शकला होता. त्यामुळे मधल्या फळीतील स्थान पक्के करण्यासाठी त्याला झगडावे लागले होते. आशिया कप स्पर्धेआधी त्याला आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी आणखी ६ सामने मिळणार आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
जितेश शर्माला संधी मिळणार?
दरम्यान, उपकर्णधार शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मॅचमधील शानदार कामगिरीनंतर संघात परतला आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाकडून अप्रतिम कामगिरी करणारा यष्टिरक्षक-बॅटर जितेश शर्मासुद्धा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं सोपं नाही, असं मानलं जात आहे.