प्रसादच्या खेळाची चमक आणि त्याच्या हालाकीच्या परिस्थितीतून केलेली जिद्दी कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या आई-वडिलांनी आर्थिक अडचणींवर मात करत प्रसादला खेळासाठी पाठिंबा दिला. प्रसादच्या आई-वडिलांनी सांगितलं की, "प्रसादने आमच्या कष्टाचे चीज केलं आहे, आणि त्याच्याकडून अजूनही मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे."
प्रसादची संघर्षमय वाटचाल:
प्रसादच्या घरची परिस्थिती अत्यंत साधी आहे. त्याचे वडील मोलमजुरी करून कुटुंब चालवतात, तर आई एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करते. या परिस्थितीतून प्रसादने आपल्या मेहनतीने खो-खो खेळात नैपुण्य मिळवले आहे. सातारा जिल्ह्याचं नाव उज्वल करत त्याने महाराष्ट्र संघात दोन वेळा निवड मिळवली आणि अखेरीस राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.
advertisement
झारखंडमधील स्पर्धेत महाराष्ट्राचा विजय:
झारखंड येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सातव्यांदा सुवर्णपदक मिळवून विजय साजरा केला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा दणदणीत पराभव केला. प्रसादने या विजेत्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रसादच्या कौशल्यामुळे त्याला 'भरत पुरस्कार' मिळाला जो खो-खो खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
शिक्षक आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन:
प्रसादने आपल्या यशाचं श्रेय त्याच्या प्रशिक्षकांना दिलं आहे. त्याला महेंद्र कुमार गाढवे, प्रणिती कदम, ओमकार कदम आणि चेतन कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. प्रसाद सध्या नववीत शिकत असून त्याचा पुढचा उद्देश भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आहे.