श्रेयसी जोशी आणि स्वराली जोशी या दोघींनी इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग प्रकारात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश मिळवलं आहे. आजवर श्रेयसीने 13 आंतरराष्ट्रीय आणि 19 राष्ट्रीय पदकं, तर स्वरालीने 7 आंतरराष्ट्रीय आणि 15 राष्ट्रीय पदकं आपल्या नावावर केली आहेत.
Ganesh idols : गाईच्या शेणापासून साकारल्या गणेश मूर्ती, महिन्याला होते हजारो रुपयांची कमाई
advertisement
श्रेयसी सांगते, मी तीन वर्षांची असताना शाळेच्या मैदानावर इतर मुलांना स्केटिंग करताना पाहिलं. तिथूनच आवड निर्माण झाली आणि स्केटिंगला सुरुवात केली. आम्ही इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग प्रकार खेळतो. यात क्लासिक, बॅटल, स्पीड अशा अनेक कॅटेगरीज असतात. क्लासिक प्रकारात डान्स परफॉर्मन्ससारखा भाग असतो, ज्यात आर्टिस्टिक आणि टेक्निकल हे दोन भाग असतात.
या खेळात कोन्स 50 मीटर, 80 मीटर आणि 120 मीटर अंतरावर ठेवले जातात. स्केटर्सना त्या कोन्सच्या दरम्यान वेगवेगळ्या स्टेप्स आणि ट्रिक्स करत परफॉर्म करावं लागतं. या खेळासाठी स्ट्रेन्थ आणि फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची असते. आम्ही रोज सोल पिलेट्सचा सराव करतो ज्यामुळे संतुलन आणि ताकद सुधारते, असं श्रेयसी सांगते. तिने कोरियामध्ये झालेल्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये क्लासिक आणि बॅटल प्रकारात भारतासाठी पहिले दोन सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.
स्वरालीने श्रेयसीकडून प्रेरणा घेऊन स्केटिंग सुरू केलं. ती म्हणते, मी श्रेयसीला पाहून स्केटिंगमध्ये रस घेतला. मागील नऊ वर्षांपासून मी नॅशनल चॅम्पियन आहे. इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंगमध्ये सीटिंग, जम्पिंग, वन व्हील ट्रिक्स, टो किंवा हिलवर ट्रिक्स यासारखे पाच भाग असतात. आम्ही रोज तीन ते चार तास नियमित सराव करतो.
या दोघींच्या यशामागे त्यांचे कोच आशुतोष जगताप यांचं मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा आहे. आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक टप्प्यावर साथ दिली, असं दोघी बहिणी सांगतात.
श्रेयसीचं पुढचं ध्येय वर्ल्ड गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं आहे, तर स्वरालीला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा आहे. या स्केटर सिस्टर्सचा प्रवास केवळ पदकांचा नाही, तर चिकाटी, मेहनत आणि प्रेरणेचा आहे.