एसीमधून पाणी गळत असल्यास अनेकजण एसीखाली बादली ठेवतात. यामुळे घरातील फरशीवर पाणी पडत नसलं तरी त्याचा एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. भिंत खराब होते. त्यामुळे तुम्ही टेक्निशियन बोलावून ही समस्या दूर करू शकता. पण पैसे खर्च न करताही तुम्ही घरच्याघरी उपाय करून ही समस्या दूर करू शकता.
एसीमधून पाणी गळण्याची ही आहेत कारणं
advertisement
- एअर फिल्टरमध्ये घाण साठणं
- भिंतीवर चुकीच्या ठिकाणी एसी बसवलेला असणं
- एसीतील ड्रेनेजमध्ये बुरशी होणं
- एसी पाईप खराब होणं
- एसीमध्ये रेफ्रीजरेशन न होणं
अशी करा समस्या दूर
एसीची ड्रेनेज लाईन स्वच्छ करा
एसी युनिटमधील गळतीची समस्या सोडवण्यासाठी त्याची ड्रेनेज लाईन स्वच्छ करा. ती जास्त काळ स्वच्छ राहावी, यासाठी 6 महिन्यांतून एकदा पाण्यात व्हिनेगर घालून ती स्वच्छ करावी. असं केल्यानं पाईपजवळ असलेले सर्व जीवाणू नष्ट होतात, व ड्रेनेजमध्ये बुरशी होत नाही.
ड्रेन पॅनकडे लक्ष द्या
एसी युनिट व्यवस्थित चालावे, यासाठी ड्रेन पॅन चांगले असणे आवश्यक आहे. अनेकांना असं वाटतं की, कोणत्याही प्रकारचे ड्रेन पॅन त्यांच्या एसी युनिटसाठी योग्य आहे. पण तसं नाही. ड्रेन पॅन एसीमधील अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे घराबाहेर काढण्याचे काम करतं, हे लक्षात ठेवा.
एअर फिल्टर बदला
एअर फिल्टर स्वच्छ नसल्यामुळे एसीमधून पाणी गळू लागते. अशावेळी दर 2-3 महिन्यांनी ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. तसेच ते खराब झाल्यास ताबडतोब बदलून घ्या. कधीकधी अस्वच्छ एअर फिल्टरमुळे एसीमध्ये मोठा बिघाड देखील होऊ शकतो.
दरम्यान, तुमच्या घरातील एसीमधून पाणीगळती होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता ही समस्या सोडवणं गरजेचं आहे.